दोन्ही 'बहू' संसदेत भिडल्या
सोनिया गांधी यांनी You don't talk to me अशा शब्दात स्मृती इराणींना फटकारले.;
संसदेतमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष गेल्या काही वर्षात अनेकवेळा टोकाला गेल्याचे प्रकार घडले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही काँग्रेसने पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेत महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन सरकारला लक्ष्य केले आहे. पण गुरूवारी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला. याच गदारोळात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली, त्यांचा वाद टोकाला गेल्याने काही नेत्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
लोकसभेत नेमके काय घडले?
अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी एका आंदोलना दरम्यान राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत, सोनिया गांधी यांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर मोठा गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आले. पण या वादात भाजपच्या महिला खासदाराच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधी त्यांच्याशी बोलायला आल्या त्यावेळी स्मृती इराणी मध्ये बोलल्या, त्यावर "You don't talk to me' असं म्हणत सोनिया गांधी निघून गेल्या.यानंतर स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्या या वादानंतर काही खासदारांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटल्याचे समजते. दरम्यान सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांचा अपमान केल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे.