महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 चे निकाल हाती आले आहेत. महाराष्ट्राने महायुतीला स्पष्ट कल दिला आहे. महायुतीने 288 पैकी 236 जागांवर आघाडी घेतली. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 21 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यापैकी फक्त एक विरोधी पक्षाकडून आहे, असे मतदान निकालात चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या 14 महिला उमेदवार जिंकून आल्या असून, यामध्ये दहा उमेदवारांचा पुन्हा विजय झाला आहे.
चिखली मतदारसंघातून श्वेता महाले, जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर, नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे, सीमा हिरे नाशिक पश्चिम मधून, मंदा म्हात्रे बेलापूर येथून, दहिसर मधून मनीषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकूर, पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, शेवगाव मतदार संघातून मोनिका राजळे आणि कैज मधून नमिता मुंदडा, भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, वसई मतदारसंघातून स्नेहा पंडित आणि फुलंबरी मतदारसंघातून अनुराधा चव्हाण या भाजप पक्षातील महिलांना दणदणीत विजय मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून साक्री मतदारसंघातून मंजुळा गावित आणि कन्नड मतदारसंघातून संजना जाधव या महिला विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे, अनुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक आणि श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. तर काँग्रेस पक्षातून धारावी मतदारसंघातून ज्योती गायकवाड या विजयी झाल्या आहेत.