लेकीला घेऊन नमिता मुंदडा विधीमंडळात, शेअर केली भावनिक पोस्ट

Update: 2024-12-08 10:38 GMT

"आई" होणं एका स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि सामर्थ्य देणं असतं. आईपण म्हणजे फक्त जन्म देणं नव्हे, तर आपल्या मुलांच्या भविष्याचा आधारस्तंभ असणे, त्यांना मार्गदर्शन देणे आणि त्यांचं पालन-पोषण करणे. अनेक महिलांनी सिद्ध केलं आहे की आई होऊनही त्यांनी विविध क्षेत्रांत उच्च शिखर गाठले आहे. राजकीय जीवनात काम करणाऱ्या महिलांसाठी कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधणं खूप कठीण असतं, तरीही आई होणं हे त्यांना एक वेगळं सामर्थ्य आणि प्रेरणा देतं. मुलांसोबत वेळ घालवणं आणि त्यांना योग्य शिक्षण, संस्कार देणं ही त्यांच्या कामाची प्रगती साधताना त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य बनतं.

आमदार नमिता मुंदडा या त्यांची लाडकी लेक वियानाला घेऊन अधिवेशनाला आल्या होत्या. याबद्दल त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. नमिता मुंदडा यांची मुलगी वियाना ही दोन महिन्यांची होती, तेव्हा नमिता मुंदडा तिला घेऊन विधिमंडळात आल्या होत्या. त्यावेळी लेकीला घेऊन विधिमंडळात आल्याने प्रचंड चर्चा झाली होती. आता त्यांची लेक वियाना पाच वर्षांची झाली आहे. तिला घेऊन नमिता मुंदडा विधिमंडळाच्या अधिवेशनात आल्या होत्या. फडणवीस सरकारचं पहिलं विशेष अधिवेशन होत आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. या पहिल्या दिवशी नमिता मुंदडा लेक वियानाला घेऊन आल्या होत्या.

नमिता मुंदडा यांनी शेअर केलेली पोस्ट

पाच वर्षांपूर्वीची ती सकाळ अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. गर्भवती अवस्थेत, हृदयात असंख्य स्वप्नं, भीती आणि अनेक जबाबदाऱ्या घेऊन मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या दाराशी उभी होते. माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती,"आई, तू हे करू शकतेस !"

आज पाच वर्षांनंतर तीच माझी चिमुकली कन्या वियाना आता पाच वर्षांची झाली आहे. तिच्या छोट्या हातात हात धरून पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मी शपथविधिच्या निमित्ताने विधिमंडळाच्या दारात उभी आहे. हा क्षण माझ्यासाठी एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक आई म्हणून खूप आनंददायी आहे.

तिच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय - संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं.

Tags:    

Similar News