लाडक्या बहिणींच्या नावाने मत विकत घेण्याचं काम भाजप करते - प्रणिती शिंदे
विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोटचे उमेदवार सिद्धाराम सतलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "भाजपच्या त्रासाला आणि त्यांच्या आमदाराला तुम्ही वैतागला आहोत. हे आमदार फक्त जीआर वर आहेत. बाकी अस्तित्वात काही दिसत नाही. बाराशे ते तेराशे कोटींचा निधी हा फक्त कागदावर आहे. मागच्या 5 वर्षात अक्कलकोट तालुक्यात काहीच विकासकामे झालेली नाही. त्यामुळे भाजपकडे माणुसकी आणि संस्कृती नाही आहे. एकीकडे महिलांवर बलात्कार करतात, चार वर्षांच्या लहान मुलीला पण सोडत नाहीत आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या नावाने महिलांना आमिष दाखवून मत विकत घेण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे त्यांना कधीच माफी नाही. भाजपने साम, दाम, दंड, इडी, सिबीआय वापरल तरी विजय हा काँग्रेस आणि लोकशाहीचा होणार आहे. आता कोणीही किंगमेकर नसून जनताजनार्दन किंगमेकर ठरणार आहे."