''मी गंगा भागीरथी नाहीच'' का म्हणाल्या माजी मंत्री यशोमती ठाकुर | Yashomati Thakur
''हो, मी गंगा-भागिरथी नाही, मी कधीही माझ्या नावासमोर तसा उल्लेख करणार नाही..'' मंत्री यशोमती ठाकूर यांचे सरकारला खडेबोल, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागीरथी’ हा शब्द वापरण्याबाबत जो प्रस्ताव पाठवला आहे त्यावर माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी जोरदार टीका केली आहे..;
हो, मी गंगा-भागिरथी नाही, मी कधीही माझ्या नावासमोर तसा उल्लेख करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी अगदी निक्षून सांगते, हा असला काही निर्णय या राज्यात आम्ही होऊ देणार नाही. मी माझ्या पतीला गमावलं. त्यांच्या अचानक निधनानंतर मी माझ्या दोन मुलांना सांभाळलं, मोठं केलं. मला या देशातील संविधानामुळे समानतेचा, शिक्षणाचा अधिकार मिळाला. मी आज एक स्वतंत्र माणूस म्हणून जगतेय. गुलामगिरीच्या जोखडातून समस्त दलित-शोषित-वंचित आणि महिला मुक्त झाल्या. मात्र तरीही ही जोखडं पुन्हा या सर्व वर्गाच्या गळ्यात बांधायचा डाव मनुवादी लोकं सातत्याने करत असतात. हा घातक डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी हा डाव उधळून लावायची शपथ घेऊया.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसने देशाला विकसित राष्ट्रांच्या यादीत बसवण्यासाठी कष्ट उपसले. आज देश जिथे आहे, ते केवळ काँग्रेस आणि काँग्रेसने रोवलेल्या पुरोगामी विचारांमुळे. पुरोगामी विचारांचा ध्वज राखण्यात महाराष्ट्राने नेहमीच अग्रगण्य भूमिका निभावली आहे. याच राज्यात सध्या विधवांना गंगा-भागिरथी म्हणण्याबाबच्या प्रस्तावावर चर्चा-वाद सुरू आहेत. जातिभेद-धर्मभेद मिटवण्यासाठी याच राज्यात आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्नांचा पुरस्कार केला गेला. स्वतः डॉ. आंबेडकरांनी याचा पुरस्कार केला, वस्तुपाठ घालून दिला, त्याच राज्यात राज्याचे महिला व बालविकास मंत्री कधी गंभा, कधी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांवर बंदीच्या भाषा बोलतायत. हे कशा प्रकारचं सरकार आलंय, या प्रतिगामी सरकारने राज्यातील छत्रपती शिवरायांच्या धोरणांतून फुललेला शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार संपवायचा विडा उचलला आहे.
विधवा महिलांना आधीच अनेक कुचंबणांचा सामना करावा लागतो. सामाजिक परिस्थितीशी झगडा देत असताना त्यांना नवनवीन विशेषणं लावून त्यांची स्थिती बदलणार नाही. त्यांच्यासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी काम केले पाहिजे. कोविड काळात या विषयाकडे आम्ही गांभीर्याने पाहिलं, आणि विविध योजनांचा लाभ त्यांना एकछत्री कसा मिळेल यासाठी उपक्रम राबवले. राज्याची माजी महिला व बालविकास मंत्री म्हणून मला वाटतं सरकारकडून अशा संवेदनशीलतेची अपेक्षा आहे.
गंगा-भागीरथी उल्लेखाच्या निमित्ताने विविधांगी चर्चा सुरू आहेत. मला वाटतं अशा चर्चा सुरू करून सरकार महागाई, अदानी, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न अशा मुलभूत प्रश्नांपासून पळण्याचा प्रयत्न करतंय. सरकारला आम्ही पळू देणार नाही. आम्ही संविधानाचे पाईक आहोत, गंगा-भागीरथी नाही. आम्ही जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी लढू आणि तुमचा प्रतिगामी विचार उखडून फेकू.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान
यशोमती ठाकूर यांचा लेख..