मतदारांना निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी महिला खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा
निवडणूक काळात मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी एका महिला खासदाराला दोषी ठरविण्यात आले असून,न्यायालयाने दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
तेलंगाणातील महबूबाबादच्या तेलंगाणा राष्ट्रीय समिती (TRS) च्या खासदार मलोत कविता असं या खासदराचं नाव आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा कोर्टाने पैसे वाटल्याप्रकरणी एखांद्या खासदाराला शिक्षा सुनावली आहे.
2019 निवडणुकीत कविता यांचे सहकारी शौकत अलीला मतदारांना पैसे वाटप करताना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी ते मलोत कविता यांना मतदान करण्यासाठी प्रति मतदार 500 रुपये वाटत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आरोपी तर खासदार कविता यांना दुसरा आरोपी बनवलं होते.
पोलिसांनी सुनावणीदरम्यान फ्लाइंग स्काव्डच्या अधिकारी आणि त्यांच्या रिपोर्टला पुरावा म्हणून सादर केले. तसेच पोलीस तपासाच्या चौकशीदरम्यान शौकत अलीने कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याचे कबुल केले. त्यामुळे खासदार यांना कोर्टाने सहा महिन्याचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, आरोपींना उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यासाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी कविता लवकरच तेलंगणा उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करणार आहेत.