एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या 34 आमदारांनी राज्यपालांना पत्र दिलेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असल्याचं म्हटले आहे, तसेच प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नेमणूक त्यांनी केलेली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून काढलेले आदेश बेकायदा आहेत अशीही भूमिका या आमदारांनी मांडलेली आहे. त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदारांना आवाहन करत आपण राजीनामा द्यायला तयार आहोत आणि शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या उशिरा त्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा सोडत मातोश्रीवर गेले.
यासर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नसल्याने सरकार संकटात आले आह असे आता सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो आहे. इतकंच नाही तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुरतमध्ये राहण्याची सोय करण्यापासून आसाममध्ये नेण्यापर्यंत भाजपनेच सहकार्य केल्याचा आरोप सामनामधून संजय राऊत यांनी केला आहे. या बंडखोर आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असाही आरोप शिवसेना करते आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे नक्की कुणाचा हात आहे? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.