Viral video : गुवाहाटीचा खर्च पण आमच्याकडूनच काढतात वाटतं..

Update: 2022-07-07 14:10 GMT

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शपथ घेतली. हा दिवस येण्याअगोदर काही दिवस राज्याच्या राजकारणात अगदी नाट्यमय परिस्थिती होती. राज्याच्या राजकारणात नक्की काय घडतंय याचा सुगोवा भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा आला नाही. आदल्या दिवशी राज्यसभेचे तर दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताच दुसऱ्याच दिवशी एक बातमी समोर आली. ती म्हणजे एकनाथ शिंदे नॉटरिचेबल...

एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल आहेत या बातमीनंतर थोड्याच वेळात ते सुरत मध्ये असल्याची बातमी समोर आली. आणि हळूहळू एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील माहिती समोर येऊ लागली. मग असं समजलं की एकनाथ शिंदे हे एकटेच नाही तर त्यांच्यासोबत काही शिवसेनेचे आमदार सुद्धा सुरत मध्ये आहेत. मग एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या बंडाची चर्चा राज्यात नाही तर संपूर्ण देशभर सुरू झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग आला. जस जसा वेळ जाईल तस-तसा शिवसेनेतून शिंदे गटाला जाऊन मिळणाऱ्या आमदारांची संख्या वाढत होती. हे सर्व लोक सुरत मधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये राहिले होते.

काही दिवस सुरत मध्ये राहिल्यानंतर एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले आमदार हे थेट गुवाहाटीला पोहोचले. गुवाहाटी मध्ये तर त्यांच्यासाठी एक संपूर्ण पंचतारांकित हॉटेलच बुक करण्यात आले होते. ज्या ठिकाणी हे बंडखोर आमदार राहिले होते ते हॉटेल कसं होतं हे आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं तुम्हाला आठवत असेलच की, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील एकदम ओके मधी आहे.

या आमदारांसाठी केलेली ही सुविधा हे पंचतारांकित हॉटेल हे सगळं खरंच एकदम ओके होतं. मात्र या आमदारांसाठी एवढा मोठा खर्च कोण करत आहे? अशी सुद्धा चर्चा सुरू होती. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर या आमदारांसाठी दिवसाला जेवणासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च केले जात असल्याचे सुद्धा म्हंटल होतं. त्यांनी सुद्धा हा इतका मोठा खर्च कोण करत आहे? असा प्रश्न केला होता. आदित्य ठाकरेंचं ठीक आहे पण आता थेट सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा याविषयी बोलू लागले आहेत.

देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. यातच भर म्हणून काल घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली. ही वाढ होतात समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो आहे की, आज मी गॅस सिलेंडर आणायला गेलो होतो. पण अचानक गॅस सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढली. त्याचा मित्र त्याला म्हणतो किंमत वाढली तर त्याला काय झालं? यावेळी मित्राला उत्तर देताना तो म्हणतो की, काय रे गुहाटीचा खर्च पण लगेच आमच्याकडून काढत आहेत काय? सध्या या व्हिडिओने समाज माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे.



Tags:    

Similar News