नवी दिल्ली: कोरोनाच्या मुद्यावरून कॉंग्रेस आणि केंद्र सरकार यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोपांची फेऱ्या सुरू आहे. राहुल गांधीं ( rahul gandhi ) यांच्यासह कॉंग्रेसचे सर्वच नेते मोदी सरकार कोरोना रोखण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री विरोधकांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर देतांना पाहायला मिळत आहे. राहुल गांधींनी केलेल्या अशाच एका आरोपाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उत्तर देत, खोचक टोलाही लगावला आहे. कोरोना संबधी केंद्र सरकारवर राहुल गांधी सतत टीका करत आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी ट्विट करत, 'जुलै महिना सुरु झाला, मात्र अजूनही लसी आल्या नाहीत', असा आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
त्यांच्या या ट्विटला उत्तर देतांना स्मृती इराणी म्हणाल्यात की, 'जुलै महिन्यात 12 कोटीं लसीचे डोस राज्य सरकारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच राज्य सरकारांना 15 जुलैपूर्वी लसीच्या पुरवठ्याविषयी माहिती देण्यात आली होती, कदाचित लसीच्या नफ्यात व्यस्त असलेल्या कॉंग्रेस सरकारांनी राहुल गांधींना माहिती दिली नाही...तर 'माहित नाही हे महाशय कधी झोपेतून उठतील', असा खोचक टोलाही स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना लगावला.
केंद्रातील रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सुद्धा राहुल गांधींना उत्तर देताना म्हंटल आहे की, जुलै महिन्यात लसीचे 12 कोटी डोस उपलब्ध होतील, जे खासगी रुग्णालयांच्या पुरवठ्यापेक्षा वेगळ्या आहेत. राज्यांना 15 दिवस अगोदरच या पुरवठ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी कोरोनाविरूद्धच्या लढाईत गांभीर्य होण्याऐवजी राजकारण करणे योग्य नाही, असा टोला गोयल यांनी लगावला आहे.