EXCULSIVE : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्यानंतर त्यांना कोणती ऑफर दिली? भाजपसोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, आमदारांच्या बंडाचे खरे कारण काय आहे, याबाबतची Exclusive माहिती देणारा मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचा स्पेशल रिपोर्ट....;
शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात झालेल्या बंडाचे कारण काय आहे, याची चर्चा देशभरात सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड का केले, असा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले याची एक्सक्लुझिव्ह माहिती मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी जेव्हा गुवाहाटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली.
या संवादा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दाखवली. त्यालाही जेव्हा एकनाथ शिंदे यांनी नकार दिला त्यानंतर मात्र भाजपला पाठिंबा दिल्यास आपली हरकत नसेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती या आमदारांनी दिली आहे. एवढेच नाही तर आणखीही काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असाही दावा या आमदारांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडील संख्याबळ ५०च्या वर जाऊ शकते, अशी शक्यता आहे.
याच चर्चे दरम्यान या आमदारांनी बंडाचे कारण देखील सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि आमदारांच्या तक्रारींकडे केलेले दुर्लक्ष, केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांमुळे अडचणीत आलेल्या नेत्यांना मदत न कऱणं अशी कारणं सांगितली.
या सर्व बंडाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती बंडखोर आमदारांनी दिली आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांच्या सततच्या हस्तक्षेपालाही मंत्री आणि आमदार वैतागले होते, असेही या आमदारांनी सांगितले.