एकनाथ शिंदे गटात अजूनही उद्धव ठाकरेंचा दरारा..

Update: 2022-06-24 04:01 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. मंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या 34 आमदारांचे राज्यपालांना पत्र दिले. यामध्ये मीच पक्षाचा गटनेते असल्याचं म्हणत त्यांनी प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नेमणूक केली. राज्याच्या राजकारणात अशी नाट्यपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. या सगळ्यात काल एकनाथ शिंदे यांनी प्रतोद म्हणून नेमणूक केलेले आमदार भरत गोगावले एका माध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नामुळे गोंधळात पडलेल्या गोगावले यांनी थेट महिलेचा एकेरी उल्लेख करत बोलणं केलं, आता त्यांचं हे संभाषण समाजमाध्यमांवर व्हायरल होतं आहे.

भरत गोगावले हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. बोलत असताना वृत्त निवेदकाने त्यांना तुमचे नेते कोण एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला? आता या प्रश्नाने गोंधळात पडलेले गोगावले यांना काय उत्तर द्यावं हे समजेना.. ते म्हणाले मी आत्ता लगेच काही सांगू शकत नाही आम्हाला थोडा विचार करू द्या.. उद्धव ठाकरे आमचे नेते होते आम्ही नाही बोलत नाही.. आता असं म्हंटल्यानंतर त्यांना पुन्हा होते की आहेत असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत असं उत्तर दिले. खरतर ते या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळत होते. मात्र गोगावले यांचे हे उत्तर देताच वृत्तनिवेदकाने पुन्हा त्यांना उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत की नाही असा प्रश्न केला? त्यावर ते भडकले व आता ताई पुढे कशाला वाढवतेस. जय हिंद जय महाराष्ट्र कर, दिले ना तेवढं सांग पुढं उद्याच्या दिवसासाठी सुद्धा ठेव ना काहीतरी.. असं म्हणत आपले नेते एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे या प्रश्नावरून त्यांचा गोंधळ उडाला होता. त्यांची हा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरलं होतं आहे.


Tags:    

Similar News