व्टिटर इंडीयाच्या हेड महिमा कौल यांचा राजीनामा
#ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले होते. आदेशाचे पालन न झाल्यास कडक कारवाईला सामोरे जाण्याचा ईशारा मोदी सरकारने ट्विटरला दिला होता.;
शेतकरी आंदोलनादरम्यान ग्लोबल सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून भारतात जोरदार चर्चा सुरु असतानाच आता ट्वीटर इंडियाच्या धोरण प्रमुख महिमा कौल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हिमा कौल आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत, असंही ट्विटरने सांगितलं.
ट्विटरने गेल्या आठवड्यात काही अकाउंट ब्लॉक केली होती. शेतकरी आंदोलनाशी संबंधित पोस्टमुळे ही अकाउंट बंद करण्याची सूचना सरकारने केल्यानंतर ट्विटरने संबंधित अकाउंटवर कारवाई केली होती. या प्रकरणाशी कौल यांच्या राजीनाम्याचा संबंध नाही, असे ट्विटरमधील सूत्रांनी सांगितले. कौल याच्याकडे मार्चअखेरपर्यंत पदाची सूत्रे कायम राहतील, असे ट्विटरने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
दरम्यान, #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील केंद्र सरकारने ट्विटरला दिला होता. 30 जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन करण्यात न झाल्याने सरकारने नाराजी व्यक्त केली होती.