Union Budget 2021 : "केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली" – मंत्री यशोमती ठाकूर
केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेत्या व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी, 'या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत." अशी टीका केली आहे.
"सरकारला सर्वाधिक कर मुंबईतून मिळतो. मुंबई आणि महाराष्ट्र अनेकांना रोजगाराची संधी आणि स्थैर्य देतो. तरीही केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईच्या वाट्याला काहीच आले नाही! हा अर्थसंकल्प मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, अशी टीका ठाकूर यांनी केली.
राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. "कोरोना लस सर्वसामन्यांना मोफत देण्यात येणार की नाही, याबाबतची कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. तसेच या बजेटमधून कामगार वर्गासाठी कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. फक्त रोजगार पोर्टल बनवण्याची घोषणा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे" असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.