सरकारने महिला सुरक्षेची जणू व्याख्याच बदलली; चित्रा वाघ ठाकरे सरकारवर संतापल्या
राज्यात सामान्यांवर हल्ले व्हायचे आता प्रशासकीय यंत्रणेवर हल्ले होत आहेत. ठाणे महापालिकेच्या महिला सहाय्यक आयुक्तांचे एका फेरीवाल्याने बोट छाटले. वाशिमच्या पोलिस कर्मचारी महिलेवर नांदेडच्या एका पोलिस निरीक्षकाने बलात्कार केला. एका महिला तहसीलदाराची 'हरासमेंट' सुरु आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर सरकारने अद्याप नेमणुक केली नाही. सरकारने महिला सुरक्षेची जणू व्याख्याच बदलली आहे. राज्यात सत्तेचे बेलगाम घोडे उथळले आहेत. सरकार विकृतांना राजाश्रय देण्याचे काम करीत आहे, असा आरोप भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केला.
भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखालील स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चित्राताई वाघ ह्या नांदेड शहरात आल्या असता, त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
राज्यात वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.दरम्यान राज्यातील मंत्र्यांवर जेंव्हा एखादा आरोप होतो तेंव्हा महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षातील नेते एकत्र येतात, कुणी म्हणत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, कुणी म्हणत हा आरोप चुकीचा आहे पण जेंव्हा राज्यातील महिलांचा एखादा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असेल तर हे मंत्री एकत्र येत नाही असं चित्रा वाघ म्हणाल्या.