राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने रविवारी तिसरी यादी जाहीर केली. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांला अनुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे पदाधिकारी होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना आपल्या चिन्हावरून उमेदवारी दिली आहे. अनुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळविण्यासाठी नवरा फहाद अहमद हे प्रयत्न करत होते. मात्र आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आल्याने फहाद यांनाच राष्ट्रवादी पवार गटात घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मागील काही दिवसांपासून फहाद अहमद यांच्या नावाची चर्चा होती. समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी विधानसभेसाठी मुंबईतील अणुशक्तीनगरची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून फहाद अहमद हे अणुशक्तीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, आता त्यांनी समाजवादी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्यांना अणुशक्तीनगरसाठी तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने फहाद अहमद यांला उमेदवारी दिल्यानंतर अणुशक्तीनगरचा सामना हा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा होणार आहे. कारण महायुतीकडून म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली गेली आहे. तर सना मलिक विरूद्ध फहाद अहमद अशी लढत होणार आहे.
कोण आहेत फहाद अहमद?
फहाद अहमद हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ज्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्टुडंट्स युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. २०२२ मध्ये, अबू आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. फहाद अहमद यांचा अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.