पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आज देहूमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले त्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालं मात्र मंचावर उपस्थित असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मात्र भाषण करण्यापासून डावलण्यात आले. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या भाषणाच्या अगोदर अजित पवार यांचे भाषण व्हायला हवे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यापासून डावलल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या की, अजित पवारांच्या कार्यालयाने पीएम ऑफिसला विनंती केली होती की, अजित पवारांना भाषण करायचे आहे. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, पीएम कार्यालयाने अजित पवारांच्या भाषणाला परवागणी दिली नाही, असा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. हा सगळा प्रकार घडल्यानंतर खुदा राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून या संपूर्ण प्रकारावर टीका केली जात आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ज्या जिल्ह्यात पंतप्रधान जातात तेथील पालकमंत्र्याला त्यांच्यासोबत राहावे लागते तो या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे अजित दादांचे जाने हे त्यांचे कर्तव्य आहे. पण त्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू न देणे हे मला अयोग्य वाटले. अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.