अनेकांनी नको म्हणूनही शरद पवारांनी तिन्ही दलात मुलींचा समावेश केला आणि..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संरक्षण मंत्री असताना मुलींना संरक्षण दलात समाविष्ट करण्यास अनेकांचा नकार होता. मुलींना हे जमणार नाही असं अनेकांनी सांगितल्या नंतर देखील त्यांनी तीनही दलात ११ टक्के जागा मुलींना दिल्या आणि नंतर काय घडले वाचा..

Update: 2022-08-11 02:21 GMT

बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज दिल्ली येथील निवासस्थानी माझी भेट घेतली. यावेळी या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली.

देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी असताना मी प्रश्न उपस्थित केला होता की मुलींना लष्करात का घेतलं जात नाही. त्यावर अनेकांनी शक्य नाही असंच उत्तर दिलं. मी सगळ्यांना एक महिना विचार करण्याची संधी दिली. एक महिन्यानंतरही मला तेच उत्तर मिळालं. नेहमीच्या बैठकांनंतर सातव्या बैठकीत मी माझा निर्णय दिला की तीनही दलात ११ टक्के जागा मुलींना दिल्या जातील. निर्णय दिल्यावर तो राबवावा लागतो. आज मी पाहतोय की मागील वर्षीच्या २६ जानेवारीच्या परेडचे नेतृत्व एक मुलगी करत होती.

दुसरी गोष्ट हवाई दलाची होती. या दलात छोटी चूक झाली तरी जीव दगावला जातो. हे अपघात कसे कमी करायचे हा विषय संरक्षण मंत्री व हवाईप्रमुखांपुढे नेहमीच असतो. त्यावेळीही मुलींना याची जबाबदारी दिली. पुढील सहा महिन्यांत देशातील हवाई अपघाताचा रेट खाली आला. त्याचे कारण एखादे काम दिले की ते काम अधिक लक्षपूर्वक व बारकाईने करण्याचा मुलींचा स्वभाव असतो. मुलांचे याउलट काम दिलेले सोडून इतर गोष्टींकडे लक्ष जास्त असते. यातून अपघात होतो. आज तीनही दलांमध्ये मुली उत्तमरीत्या काम करत आहेत. त्यामुळे मुलगा आणि मुलगी यात कोणीही भेद करू नये.

विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारताना शेतकरी आत्महत्या या मुद्यावर चर्चा झाली. राज्यात आत्महत्येचा प्रश्न प्रामुख्याने विदर्भात जास्त होतो. यवतमाळ आणि वर्धा या दोन जिल्ह्यात आत्महत्या अधिक होतात. या जिल्ह्याची स्थिती आणि शेतीचे क्षेत्र बघितले तर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भात जमीन जास्त आहे. पण पाण्याची कमतरता आणि खात्रीचे पीक याची शाश्वती नसणे, या गोष्टींमुळे जर आर्थिक संकट आले तर त्या संकटाला तोंड देण्याऐवजी कधीकधी टोकाची भूमिका घेतली जाते. आत्महत्या टाळावी यासाठी अनेक गोष्टी करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला. ७० हजार कोटींची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना सहकार्य केलं. मात्र काही वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला. तेव्हा वसुलीची वेळ आल्यावर काहींनी आत्महत्येचा रस्ता घेतला. शेवटी आत्महत्या हा पर्याय नाही, तर आलेल्या परिस्थितीवर मात करून आपण त्यातून बाहेर कसं पडायचं, आपलं उत्पन्न कसं वाढवायचं, तंत्रज्ञान कसं वाढवायचं या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पंजाब, हरियाणा, दक्षिणेत फार आत्महत्या होत नाहीत. मग आपल्याकडे का होतात? ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करायला हवा.


Tags:    

Similar News