राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर अण्णा हजारे यांनी व्यक्त केली चिंता

Update: 2021-10-22 03:46 GMT

राज्याच्या गृहमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतील तर गुन्हेगारांवर काय धाक रहाणार? असा शब्दांत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अण्णांनी प्रतिक्रिया देताना ही चिंता व्यक्त केली.

राज्यात महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार ही चिंतेची बाब आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिलेला नसल्याने असे प्रकार होत असल्याचे म्हणत येत्या अधिवेशनात यावर कठोर कायदा करा अशी मागणी अण्णांनी केली आहे, सोबतच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत असे अण्णांनी म्हटले आहे.

आपल्याच तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर घडलेल्या प्रकारावर अण्णा भावुक झाले. या मुलीचा दोष तरी काय? असे म्हणत अण्णांनी गुन्हेगार शोधून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.

ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायची तेच भ्रष्टाचाराचे आरोपात अडकलेत, महिला अत्याचार वाढण्यामागे हे देखील एक कारण आहे. कारण गुन्हेगारांवर धाक कसा राहणार? त्यामुळे सरकारने आता कडक कायदे करायला हवे असे अण्णांनी म्हटले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी दीड वर्षांनंतर नियुक्ती झाली यावर अण्णांनी म्हटले की, असल्या आयोगांनी काही फरक पडत नाही, देशात घटना सर्वोच्च आहे. घटनेनुसार कठोर कायदे करा आणि त्याची कडक अमलबाजवणी करा, तरच गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसेल. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे.असे मत अण्णांनी यावेळी व्यक्त केले.

Tags:    

Similar News