वगळीत, ऊसाच्या पाल्यात बाळंत होणाऱ्या महिलांचं काय? या महिलांसाठी काहीतरी करा ताईसाहेब
प्रिय आमदार सरोजताई अहिरे
सप्रेम नमस्कार,
पत्रास कारण की आपण आपल्या तान्हुल्याला घेऊन विधानसभेत गेल्याच्या बातम्या पाहिल्या. विधानसभेत आपल्याला देण्यात आलेला केवळ नावाची पाटी बदललेला हिरकणी कक्ष देखील पाहिला. त्याच कक्षात बसून तुम्ही दिलेली प्रतिक्रिया देखील पाहिली. हिरकणी कक्षात साधा बेड नाही. लहाण बाळाला किती वेळ उचलून घेऊन राहणार? आपली वेदना पाहिली. त्या वेदनेवर लावलेल्या सॅड म्युझिक मुळे तर डोळ्यात आसवं आली. मन गदगदून गेलं. आमदारांच्या बाळाची काळजी घ्यायला मंत्रालयात सुसज्ज हिरकणी कक्ष नाही? हा तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. बाळाच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी सरकारने घ्यायलाच हवी. लाखो लोक बसून गेलेला सोफा इन्फेक्टेड असला तर?
ताई, इन्फेक्टेड शब्दावरुन आठवलं. ज्या लोकांनी इन्फेक्टेड शब्द उभ्या आयुष्यात ऐकला नाही अशा कित्येक भटक्या, कुटुंबातील महीला ओढ्याच्या काठावर एखादया वगळीत बाळंत होतात. ऊसतोड भगिनी तर उसाच्या पाल्यातच बाळंत होतात. काही तासाने पुन्हा त्यांच्या कामावर जॉइन आपलं , रुजू , …. ऊसतोडीला सुरवात करतात. त्या पाल्यात इन्फेक्शन करणारे अनेक घटक देखील असतात. उसाच्या पाल्याचा ढीग आणि त्यावर फाटक्या साडीने केलेली सावली हाच या हिरकणींचा हिरकणी कक्ष असतो. ऐकायची हिंमत असेल तरच पुढचं सांगतो, याच पाल्याच्या सरित झोपवलेल्या तान्हुल्याच्या अंगावरून ऊसाचा ट्रॅक्टर जाण्याच्या अनेक घटना देखील या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत ताई…
ऐकून अंगावर काटा आला ना ? याच अवस्थेत राज्यातील अनेक महीला दिवस काढत आहेत. गडचिरोलीतील अनेक गरोदर स्त्रियांना ट्रॅक्टर मध्ये पाला टाकून दवाखान्यात न्यावे लागते. कित्येकदा त्या महीला ट्रॅक्टरमध्येच बाळंत होतात. ताई ही अवस्था केवळ दुर्गम गडचिरोलीतीलच नाही. तर नंदुरबार पालघर रायगड सातारा यासह अनेक जिल्ह्याची आहे. साताऱ्यातील कोळेकरवाडी वनवासवाडी गावातील स्त्रियांना झोळितुन बाळंतपणासाठी न्यावे लागते. झोळीतुन पुरुष्यांच्या अंगावर पाऊल वाटेवर रक्ताचा ओघळ पडतो. ताई तुमची वेदना ही या राज्यातील अनेक स्त्रियांची वेदना आहे. किंबहुना तुमच्या वेदनेपेक्षा अधिक धारदार वेदना ग्रामीण आदिवासी भागातील स्त्रिया सोसत आहेत. ज्या राज्यात आमदार असलेल्या स्त्री ला न्याय मागण्याची वेळ येते त्या राज्यात या साधारण स्त्रियांच काय होत असेल याचा आपण गांभीर्याने विचार करावा…
तुमच्यावर जी वेळ आलेली आहे. त्या अनुभवातून वर्षानुवर्षे दुःख भोगणाऱ्या या स्त्रियांसाठी काही करता आलं तर नक्की करा ताईसाहेब…
आपलाच….