राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी मागणी केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसत आहे. रश्मी शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीची मागणी काँग्रेसने केली. त्यानंतर रश्मी शुक्लांवर विरोधकांचे फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. यानंतर नाना पटोलेंनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तातडीने बदली करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. संजय राऊत यांनीही रश्मी शुक्लांच्या बदलीचे मागणी लावून धरली होती. तसेच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.
मविआच्या काळात रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. तर काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस नेत्यांकडून रश्मी शुक्लांवर आरोप करण्यात आले होते, तर आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली असून निवडणूक आयोगाकडून रश्मी शुक्लांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रश्मी शुक्लांना सध्या कार्यमुक्त करण्यात यावं असे देखील निवडणूक आयुक्त म्हणाले आहेत.