"सत्ता येते नी जाते.." उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट व्हायरल..
सर्वोच्च न्यायालायच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झाले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ठाकरे बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. या सगळ्यानंतर राज ठाकरे यांचे एक ट्विट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी सरकारला उद्देशून म्हटलं होतं की, "सत्ता येते नी जाते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.." राज ठाकरे यांचे ट्विट आता व्हायरल होतं आहे. ज्यावेळी राज्यात भोंग्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता त्यावेळी त्यांनी केलेले हे ट्विट आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी सरकारने मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर राज ठाकरे यांनी सरकारला उद्देशून एक पत्र ट्विटरवर शेअर केले होते. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हंटल होतं की, "सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. तब्बल २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. सत्ता येते नी जाते आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!" असं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हंटल होतं.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP
या पत्राला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ उलटून गेल्यानंतर हे पत्र पुन्हा समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर या पत्राची चर्चा समाज माध्यमांवर होतं आहे.