मिसेस मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची पंतप्रधानांकडून विचारपूस
नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन;
सध्या राज्यात शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या चर्चेवरुन राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त सामनामधून देण्यात आले आहे. पण या फोनचे कारण राजकीय नसून कौंटुबिक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फोन केल्याचे या वृत्तात सांगण्यात आले आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खास फोन करून 'सामना'च्या संपादक सौ.रश्मी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले, असे वृत्त देण्यात आले आहे.