"जेव्हा संसदीय कामकाज मंत्रीच 'हम दो हमारे दो'चा खुलासा करतात"
व्हिडीओ शेअर करत शिवसेनेच्या महिला नेत्याने उडवली खिल्ली
कृषी कायद्यांवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हा देश फक्त चार लोक चालवत आहेत, हम दो हमारे दो....असे म्हणत राहुल गांधी यांनी आपला रोख कुणाकडे आहे हे नाव न घेता दाखवून दिले. त्यांच्या या आरोपावर सत्ताधारी पक्षाच्या बाकावरील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. पण राहुल गांधी यांना कुणाचे नाव घ्यायचे होते ते खुद्द संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीच सभागृहात सांगून टाकले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संतापाच्या भरात, "राहुल गांधी यांनी अंबानी आणि अदानी यांच्याकडे देशातील ४० टक्के धान्य आणि भाजीपाला साठवलेला आहे, असा आरोप केला आहे. पण त्यांनी सभागृहात याचे पुरावे द्यावे" अशी मागणी केली. यानंतर आता प्रल्हाद जोशी यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचा हा व्हिडीओ शिवसेना नेत्या शिल्पा बोडखे यांनी शेअर केला असून त्यांचं हे ट्वीट सध्या व्हायरल झालं आहे.