मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव डावलण्यात आल्याच्या कारणांवरुन समर्थकांमध्ये नाराजी होती. तर राजीनामे पाठवून मुंडे समर्थकांनी आपली नाराजी उघडपणे मांडली होती. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची समज काढण्यासाठी आणि आपली भूमिका मांडण्यासाठी पंकजा मुंडेंनी बैठक बोलावली होती. मात्र बैठकीच रुपांतर सभेप्रमाणे झाल्याने शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी 3 आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दी जमवल्या प्रकरणी कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडलं आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
काल आपल्या भाषणात बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात, मला सत्तेची लालसा नाही, मला खुर्ची नको. मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्याबाबतीत बातम्या पेरण्यात आल्या, पण मी कुणाला घाबरत नाही. मोठा नेता नेहमी त्याग करतो असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात. तसेच आपण नाराज नसून, आपलं घर का सोडायचा असा प्रश्न सुद्धा पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उपस्थिती केला. तसेच ज्या दिवशी वाटेल तेव्हा निर्णय घेऊ, मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळत राहीन असं म्हणत पंकजा यांनी भाजप नेतृत्वालाही सूचक इशारा दिला आहे.