औद्योगिक अपघात टाळण्यासाठी नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

Update: 2024-02-14 03:37 GMT

मुंबई: राज्यात घडणाऱ्या औद्योगिक अपघातांच्या पार्श्वभूमीवर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील तळवडे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर जिल्ह्यातील चाकडोह काटोल येथे कारखान्यात स्फोट होऊन अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मृतांमध्ये महिला कामगारांची संख्या लक्षणीय असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी खालील सूचना दिल्या आहेत:

राज्यातील सर्व औद्योगिक कारखान्यांची तात्काळ तपासणी करून बेकायदेशीर कारखान्यांवर कठोर कारवाई करावी.

कार्यरत मजुरांना आवश्यक सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याबाबत सर्व उद्योजकांना सक्त सूचना द्याव्यात.

प्रत्येक उद्योग आस्थापनेने महिला कामगारांसाठी लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे.

सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट करणे आवश्यक आहे.

सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरवले पाहिजे.

अपघातात मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या कामगारांच्या कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे.

अपघातग्रस्त कुटुंबांना कारखान्याने तात्काळ आर्थिक मदत करावी.

अपघातग्रस्त मुलांचे आणि मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी.

डॉ. गोऱ्हे यांनी औद्योगिक सुरक्षा आणि कामगारांच्या कल्याणासाठी त्वरित आणि ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

Tags:    

Similar News