' कोण चाकणकर, मी नाही ओळखत'; चाकणकरांच्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर
मुंबई: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 'बायको जात चोरते तर, नवरा राजदंड चोरतो' अशी खोचक टीका केली होती. त्यांनतर चाकणकरांच्या टीकेला नवनीत राणांनी सुद्धा खोचकच प्रत्युत्तर दिले आहे.
चाकणकरांच्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्यात, 'मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण ज्यांना मी ओळखतच नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाकणकर यांनी विरोधकांवर टीकेचा सपाटाच लावला आहे. पक्षाची बाजू मांडत त्या, सतत राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांवर सतत टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशीच काही टीका त्यांनी रवी राणा यांच्यावर केली होती. त्यांच्या टीकेला नवनीत राणा यांनी सुद्धा आपल्याच स्टाईलने उत्तर दिले आहे. त्यामुळे यावर आता चाकणकर काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.