वाईन विक्रीचा निर्णय परत घेतला जाणार?

Update: 2022-02-02 08:16 GMT

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाला भाजपने जोरदार आक्षेप घेत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील वाईन विक्रीला ठेवली गेलेली दुकाने फोडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता या निर्णयाचा पुनर्विचार सुरू असल्याचे संकेत दिले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे समर्थन करत वाईन आणि दारुमध्ये फरक असल्याचे सांगितले होते.

पण या सर्व वादावर महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली नव्हती. पण आता शरद पवार यांनीही यावर मत व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, पण खूप जास्त विरोध होत असेल तर सरकारने काही वेगळा निर्णय घेतला तर त्याला आक्षेप नसेल अशी भूमिका व्यक्त केली आहे. वाइन आणि इतर मद्यांमध्ये फरक आहे, तो समजून घेतला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पण या निर्णयाला विरोध होत असेल तर सरकारने वेगळा विचार केला तर त्याला आपण विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. हा विषय जास्त चिंतेचा नाहीये, पण त्याबाबत वेगळा विचार केला तर त्याला हरकत नसेल असे पवारांनी म्हटले आहे.

एकीकडे शरद पवार यांनी ही भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही यासंदर्भात पुनर्विचार होऊ शकतो असे संकते दिले आहेत. पण मोठा विरोध होत असल्याने सरकार या पुनर्विचार करु शकते, असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार, बाळासासेहब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी वाईन संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले आहे. पण त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली आहे. जलील यांना कांगावा करणं माहिती आहे, पण वाईनच्या माध्यमातून नवे मार्केट उपलब्ध होत असेल तर तो निर्णय योग्य आहे, असेही म्हटले आहे.

Tags:    

Similar News