शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर EDने कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी सकाळी सकाळी दाखल झाले आहेत. पत्रावाला चाळप्रकरणी राऊत यांच्याविरोधात सध्या ईडी कारवाई करत आहे. पण या ED कारवाईवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केली आहे.त्याचबरोबर 'ईडी आणि त्या फोन कॉलचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही',अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे . हे सगळं पूर्ण ठरवून चालू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. पण शिवसेना संजय राऊत यांच्या मागे राहणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ज्यांच्यामागे ED लागली आहे ते लोक तिकडे गेल्यावर एकही अक्षर देखील काढत नाहीयेत, याचा अर्थ भाजपविरोधात बोललाच तर दोनच पर्याय आहेत एकतर ईडीला सामोरे जा आणि दुसरे म्हणजे भाजपात या, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. पण शासकीय यंत्रणांना त्यांचा काम करायला दिले पाहिजे, असे सांगत ईडी चौकशीला राऊत हे सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले. पण त्याचबरोबर संजय राऊत यांना व्हायरल ऑडिओ क्लीपचा या चौकशीची संबंध नाही असा दावाही त्यांनी केला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा वापर सुरू आहे, तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांविरोधात होतो आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. पण या कारवायांविरोधात शिवसैनिक आक्रमक होणार असाही इशारा त्यांनी दिला आहे.