राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून जे काही सुरु आहे ते आपण पाहतो आहोत. आता शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत आता दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या या बंडात पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील देखील सहभागी झाले होते. किशोर पाटील शिंदे गटात गेले मात्र त्यांच्या बहीण वैशाली सुर्यवंशी या उद्धव ठाकरेंसोबतच राहिल्या. पण आज रक्षाबंधन सणानिमित्त या दोघांच्यातील बहीण भावातील गोडवा पाहायला मिळाला. सध्या त्यांचे रक्षाबंधनचे फोटो समाजामाध्यमांवर व्हायरल होत असून अनेकांनी ठाकरे व शिंदे गटाचे या निमित्ताने मनोमिलन झाले असल्याचे म्हंटले आहे.
बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन आज गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी साजरा झाला. या निमित्ताने पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार किशोर पाटील व नुसत्या शिवसेनेत सक्रिय झालेल्या शिवसेनेच्या माजी आमदार कै. आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी आज हा सण साजरा केला. गेल्या दीड महिन्यापासून राज्यात शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे सोबत वेगळा गट स्थापन करून शिंदे व फडवणीस सरकार स्थापन केले आहे आणि या नवीन सरकारच्या गटात अनेक राजकीय नेत्यांच्या कुटूंबात फूट पडली आहे. पाचोरा - भडगाव मतदारसंघात देखील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या कुटूंबात देखील फूट पडली असून आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेचे नेतूत्व करण्याची जबाबदारी शिवसेनेचे माजी आमदार कै. आर. ओ. पाटील यांची कन्या सौ वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली असून मतदारसंघात राजकीय चित्र बदलले आहे. राजकीयदृष्ट्या वेगळा असल्या तरी नातेसंबंध टिकून राहतात. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे वैशाली सुर्यवंशी यांचे चुलत भाऊ असून आज रक्षाबंधन निमित्ताने या बहीण भावानेही रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.