दोन आदिवासी तरूणींची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माजी मंत्री तथा काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जेव्हा-जेव्हा महिलांवर अत्याचार झाले आहेत, तेव्हा-तेव्हा महाभारत घडल्याचं सांगत भारतातही आता महाभारत घडल्याशिवाय राहणार नसल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
मणिपूरमध्ये घड़लेली घटना अतिशय वेदनादायी आहे. मणिपूर आपल्या देशाचा भाग आहे की नाही, ७७ दिवस या सगळ्या गोष्टी कशा काय दबून राहतात, असा प्रश्नच ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर धक्का बसलाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार निर्लज्जपणे वागत आहे. महिलांबद्दल सरकार संवेदनशील नाही. या सरकारची काही जबाबदारी नाही का, असा उद्विग्न सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मणिपूरमध्ये भाजपचं सरकार नसून हैवानांचं राज्य आहे. अशा घटना घडतात, त्यातले सत्य लपवून ठेवले जाते. या घटनेबद्दल दोन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. आज ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर निर्लज्जासारखं त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यामुळं खरंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीच ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
आपण भारतात राहतो. या देशात जेव्हा-जेव्हा महिलांवर अशा प्रकारे अत्याचार झाले त्या-त्या वेळी महाभारत घडलेलं आहे. त्यामुळे सध्या सत्तेत बसलेल्यांनी राजीनामे देऊन खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अन्यथा या देशामध्ये महाभारत घडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला. तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् हा महाभारतातील भगवान श्रीकृष्णाचा श्लोकच ॲड. यशोमती ठाकूर यांनी ट्विट केलाय.