मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यावरती निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा काही पर्यटनासाठी असणार नाही आहे. तर या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या हितासाठी फार मोठ्या गोष्टी पदरात पडणार आहेत... इतकच नाही तर एकनाथ शिंदे या दौऱ्यावर एकटेच जाणार नसून त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळ सुद्धा जाणार आहे. या स्वित्झर्लंड दौऱ्यापाठीमागे काय गुपित आहे?
तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वित्झर्लंड येथील दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. आता या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी झाल्यावर महाराष्ट्राच्या हिताचं काय घडेल? या परिषदेत जवळपास 20 उद्योगांसह सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे करार होणार आहेत. आजपर्यंत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत. इतकच नाही तर या परिषदेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबर गेलेलं शिष्टमंडळ जगभरातील मोठमोठ्या मान्यवरांसोबत, गुंतवणूकदारांसोबत तसेच उद्योगांच्या प्रमुखांशी संवाद देखील साधणार आहेत.
16 व 17 जानेवारीला मुख्यमंत्री परिषदेत सहभागी होणार.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात झपाट्याने घोडदौड सुरू आहे. याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये होत असलेली ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद... या परिषदेत 16 आणि 17 जानेवारी असे दोन दिवस मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत जे शिष्टमंडळ जाणार आहे. या शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी देखील असणार आहेत. ही परिषद 20 जानेवारी पर्यंत चालणार आहे.
अनेक नामवंत लोक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट.
मंगळवार 17 जानेवारी रोजी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरबचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी आहेत. विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये करण्यात येणार आहेत.