2019 पासून महाराष्ट्रातील राजकारणात जे काही राजकीय भूकंप झाले त्यापैकी अजित पवारांनी दिलेला दणका हा अनपेक्षित होता. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. अजित पवार यांनी आपल्या आमदारांना सोबत घेऊन शिंदे सरकारसोबत युती केली आहे.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीतील आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गेले दोन दिवस महाराष्ट्रातील जनतेने अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत . उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी जनतेशी हितगुज करायला सुरुवात केली आणि कराडच्या प्रीतीसंगम येथे शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे.
एकीकडे शरद पवार दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे अजित पवार मंत्रालयात दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होणार आहे. मंत्रालयात कारभाराला सुरुवात करण्याआधी महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढ निर्धार केला असं ट्विट अजित पवार यांनी केले आहे.
या महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढ निर्धार केला. pic.twitter.com/3pVahZL95F
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2023
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आल्यानंतर सर्वप्रथम मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतीमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले, तसेच या महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढनिर्धार केला.
आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. pic.twitter.com/JKZWSsU5EU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2023
यावेळी त्यांच्यासोबत सहकारी मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अदिती तटकरे, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.