संसदेच्या 5 अधिवेशनात खासदार नवनीत राणा यांनी विचारले फक्त 28 प्रश्न
17 व्या लोकसभेच्या 5 अधिवेशनात खासदार नवनीत राणा यांनी फक्त 28 प्रश्न उपस्थित केले. तर सुप्रिय सुळे यांनी सर्वाधीक प्रश्न विचारले आहेत. पाहा राज्यातील महिला खासदारांचा संसदेतील वर्क रिपोर्ट
१७ व्या लोकसभेतील एकूण ५ अधिवेशनांत महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी ६ हजार ९४४ इतके प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे लोकसभेतील एकूण प्रमाण ९ टक्के असले तरी या खासदारांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नांचे प्रमाण २९ टक्के इतके लक्षणीय राहिले. अभ्यासासाठी निवडलेल्या १० मंत्रालयीन खात्यांपैकी सर्वाधिक ५०७ प्रश्न हे आरोग्याशी निगडीत असल्याचे संपर्क संस्थेच्या अहवालात दिसून आले.
मुंबईस्थित 'संपर्क' या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या लोकसभेतील कामगिरीचा आढावा घेत शुक्रवारी (ता. १८ जून) आपला अहवाल प्रकाशित केला. मे २०१९ ते मार्च २०२१ या काळातील लोकसभेच्या ५ अधिवेशनांत विचारलेल्या तारांकित व अतारांकित प्रश्नांसंदर्भातील माहितीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे.
गेल्या पाच अधिवेशनांत महाराष्ट्रातील खासदारांनी सरासरी १५४ प्रश्न विचारले. राष्ट्रीय पातळीवर ही सरासरी केवळ ४९ प्रश्न एवढी आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील खासदारांची प्रश्न विचारण्याची सरासरी ही राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट ठरली. ५ अधिवेशनात मिळून संसदेत विचारल्या गेलेल्या एकूण २३ हजार ९७९ प्रश्नांपैकी महाराष्ट्रातील ३८ पुरुष खासदारांनी विचारलेले एकूण ५ हजार ९४६ तर ७ महिला खासदारांचे ९९८ प्रश्न समाविष्ट आहेत.
संपर्कच्या अहवालानुसार अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी २८ प्रश्न पटलावर आणले. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक म्हणजे ३१३ प्रश्न लोकसभेत उपस्थित केले.
महिला खासदारांची कामगिरी
-डॉ.हीना गावित २४० प्रश्न
-डॉ.प्रीतम मुंडे १५७ प्रश्न
-पूनम महाजन १३० प्रश्न
-भारती पवार १०९ प्रश्न
-नवनीत राणा २८ प्रश्न
-भावना गवळी २१ प्रश्न