जळगावाच्या भादली ग्राम पंचायतीत तृतीयपंथी अंजली पाटील यांचा गुलाल

पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामीत्व पुन्हा एकदा समोर

Update: 2021-01-18 09:30 GMT

जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र. चार मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवार विजयी झाल्या आहेत. राज्यात निवडणूक लढणा-या तृतीयपंथीय अंजली पाटील या एकमेव उमेदवार होत्या हे विशेष.

तालुक्यातील भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला होता. तृतीयपंथी असल्याने त्यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख 'इतर' असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, अंजली यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली सहकारी तृतीयपंथी शमिभा पाटील यांच्या मदतीने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले. या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्याने त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. म्हणून शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांची उमेदवारी मान्य करावी लागली.

यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभले आहे. त्यामुळे आता पुरोगामी महाराष्ट्राचे पुरोगामीत्व पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Tags:    

Similar News