पंकजा मुंडेंना दिल्लीचे वेध?..

“मला त्या महिलांचा आवाज बनायचं आहे ज्यांचा आवाज या समाजाने दाबलाय” असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Update: 2021-01-19 07:30 GMT

पंकजा मुंडे पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) द्वारा ११ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या चार दिवसांच्या २ ऱ्या व्हर्च्युअल राष्ट्रीय महिला संसदेत बोलत होत्या.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एमआयटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय महिला संसदेत बोलताना भारताच्या राष्ट्रीय राजकारणात महिलांच्या कमतरते विषयी चिंता व्यक्त केली आहे.

या परीषदेत बोलताना त्या म्हणाल्या "भारताच्या संसदेत महिला सदस्यांची संख्या फक्त १२ टक्के आहे. त्यातही फक्त ८ टक्के महिला या राष्ट्रीय नेत्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मला त्या महिलांचा आवाज बनायचं आहे ज्यांची आवाज या समाजाने दाबली आहे. हा माझ्या सारख्या महिला नेत्यासाठी मोठा लढा आहे. अनेक महिलांना राजकारणात येऊन महिलांच्या संबंधित विषयावर काम करायचं आहे. मात्र आम्हा महिलांचं अस्तित्व राजकारणात कमी असल्याने आम्ही आम्हाला आरक्षण असताना देखील आमच्या प्रश्नांसाठी लढताना कमी पडतो."

पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर इथून पुढे राजकारणातील महिलांच्या सहभागावर त्यांच्या मनातली खदखद बाहेर आलेली पाहायला मिळाली. महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढण्या करिता महिलांनीच पुढे येण्याची गरज असल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होताना दिसत होतं.

पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) द्वारा आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय महिला संसदेत राजकारण, क्रिडा, मनोरंजन आणि काही संस्थांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७१ महिलांनी वक्त्या म्हणून सहभाग घेतला होता. या संसदेच्या माध्यमातून महिला केंद्रीत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

विविध विभागातील जाणकार महिलांनी महिलांच्या विकासाठी काय चांगलं करता येईल यावर आपलं मत प्रदर्शन केलं. या व्हर्च्युअल संसदेत तब्बल ३५०० प्रेक्षकांनी सहभाग घेतला होता.

Tags:    

Similar News