''मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान..'' किशोरी पेडणेकरांचे अमृता फडणवीसांना जशास तसे उत्तर

Update: 2022-08-07 08:32 GMT

कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न एका टिव्ही कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला यावर त्या उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला." आता अमृता फडणवीस यांनी असं म्हंटल्यानंतर समाजमाध्यमांवर अमृता फडणवीस यांची एकच चर्चा सुरु झाली आहे. यावरून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे. आता अमृता फडणवीस यांना मुंबईच्या माजी महापौर, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एक कविता रचत जशास तसे उत्तर दिले आहे.

किशोरी पेडणेकरांनी कवितेच्या माध्यमातून काय म्हंटल आहे पाहूयात..

एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव

मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केली

त्याला एका 'अमृता'ची दृष्ट लागली हो..

त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले...

अशी कशी नशिबाने थट्टा आज मांडली... अशा शब्दांत अमृता फडणवीसांना किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्या नेहमीच अगदी बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करत असतात. त्यांच्या याच बिनधास्तपणे बोलण्याने त्यांना समाजमाध्यमांवर अनेक वेळा ट्रोल देखील केलं जातं. पण या ट्रॉलर्सना कसल्याच प्रकारे न जुमानता त्या नेहमी आपली भूमिका मांडत असतात. पण उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर नेटकरी व शिवसेनेचे अनेक लोक तुटून पडले आहेत.

या कार्यक्रमांत अमृता फडणवीस यांना साध्य राज्यात सुरु असलेल्या राजकीय घटनांपासून ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश विचारण्यात आले आहेत. सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या 'बस बाई बस' या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी तसेच अनेक सिने कलाकार हजेरी लावत आहेत. अभिनेता सुबोध भावे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस साह्भागी झाल्या होत्या.

Tags:    

Similar News