शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी; दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकरांचा विजय

Update: 2021-11-02 10:33 GMT

दादरा-नगर हवेली पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर तब्बल ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनाला महाराष्ट्राबाहेर आपला पहिला खासदार मिळाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून डेलकर यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यामुळे ५० हजारपेक्षा अधिक मतांनी कलाबेन डेलकर यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे.

शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ मत मिळाली. तर भाजपचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार १५७ मत मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांचाही इथं पराभव झाला आहे.

शिवसेनच्या विजयानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे पहिले पाऊल. उद्धव ठाकरेंचे हे दिल्लीच्या वाटेतील मोठे पाऊल आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंचा हातात हात घेतलेला फोटो टाकत #Chalodelhi हा सुचक हॅशटॅग वापरला आहे. 

कोण आहेत कलाबेन डेलकर?

कलाबेन डेलकर ह्या दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर हे खासदार होते, पण त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपच्या काही नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर कलाबेन डेलकर यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनतर झालेल्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उशिवसेनेकडून उमेदवारी दिली होती.

Tags:    

Similar News