देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे नको आहेत का?

देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांचा द्वेष का? किंवा देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांची अडचण का वाटते? याच सोबत भाजप मध्ये नक्की काय अंतर्गत राजकारण चालू आहे? याविषयी आम्ही काही राजकीय विश्लेषकांची व पत्रकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. MaxWoman चा हा विशेष रिपोर्ट नक्की वाचा..

Update: 2022-06-14 13:04 GMT

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर त्या नाराज असल्याची राज्यात मोठी चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल तर बीडमधील भाजपा कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थक यांनी थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री होतील या भीतीपोटी आणि इर्षेपोटी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा ताईंना डावलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला व धनंजय मुंडे यांना निवडणुक जिंकण्यासाठी मदत केली असा गंभीर आरोप भाजपातीलच स्थानिक नेत्यांनी केल्याने बीड भाजपामधील पक्ष पातळीवरील खदखद समोर आली आहे.

तर आता प्रश्न असा आहे की, नक्की देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांचा द्वेष का? किंवा देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांची अडचण का वाटते? या सगळ्या विषयी आम्ही काही राजकीय विश्लेषकांची व पत्रकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पंकजा मुंडे यांच्या करिअरचे खच्चीकरण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत..

ज्येष्ठ पत्रकार जयंत माईनकर यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, "मी असं म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांचा द्वेष करतात. पण एक वस्तुस्थिती आहे की, एकेकाळी जिच्या वडिलांच्या सहाय्याने देवेंद्र फडणवीस हळूहळू शिड्या चढत वर गेले आणि चक्क त्यांना राज्याचं अध्यक्षपद मिळालं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून सुद्धा त्यांना मुंडे गटाचे मानले जायचे. त्यांचे व गडकरींचे पहिल्यापासून जमत नव्हते. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले. पण यामध्ये कुठेही आपल्याला ज्यांनी मोठे केले त्या गोपीनाथ मुंडे यांची आठवण न ठेवता पंकजा मुंडे यांच्या करिअरचे खच्चीकरण करण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत याला शंका येण्यास जागा आहे. याचं कारण असं आहे की, माझ्या माहितीप्रमाणे धनंजय मुंडे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचे संबंध अत्यंत चांगले आहेत. धनंजय मुंडे एकेकाळी भारतीय जनता पार्टी मध्ये होते. त्यांना प्रतिस्पर्धी नको यासाठी पंकजा मुंडे यांच्या विरोधात जितके काम करता येईल तेवढे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. एक साधं राजकारण ते खेळत असल्याचे मत त्यांनी MaxWoman शी बोलताना व्यक्त केले."

देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असून सुद्धा त्यांना मुंडे गटाचे मानले जातं होते. ते गोपीनाथ मुंडे यांचे बोट पकडून राजकारणात आले आणि त्यांच्याच नेतृत्वात त्यांना राज्याचे अध्यक्ष पद सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. आता गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे इतके जिव्हाळ्याचे संबंध असताना. देवेंद्र फडणवीस हेच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं करिअर संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे का म्हटले जात आहे? देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांची अडचण का वाटते? या सुद्धा प्रश्नाचे उत्तर आम्ही जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे..

देवेंद्र फडणवीस खूप पुढे निघून गेले आहेत…

देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे यांची अडचण वाटते का असा प्रश्न आम्ही जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, पंकजा मुंडे अजिबात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गातील अडसर नाहीत. देवेंद्र फडणवीस खूप पुढे निघून गेले आहेत. त्यांनी पुर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केला आहे. यावेळी पंकजा मुंडे या फक्त मंत्री होत्या. त्या दरम्यान सुद्धा त्यांच्याकडून अनेक खाती काढून घेण्यात आली. त्यांच्या परफॉर्मन्स वर सुद्धा टीका करण्यात आली. मग त्यामध्ये चिक्की स्कॅम सोबत त्यांच्यावर अनेक गोष्टींवरून टीका करण्यात आली. विशेषतः 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा धनंजय मुंडे म्हणजेच त्यांच्या भावाकडूनच दारुण पराभव झाला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची जरी सत्ता आली नसली तरी देखील 105 आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. आणि ते सध्या विरोधी पक्षनेते आहेत.

त्याचसोबत देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या मध्ये खूप सुमधुर असा संबंध आहे व त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याची एक पातळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक वेळा नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू झाल्या व कालांतराने बंद झाल्या. जोपर्यंत नरेंद्र मोदी केंद्रांमध्ये आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे बीजेपी मध्ये ज्यांना काही मिळाले नाही असं वाटलं ते सोडून गेले व त्याच दरम्यान राष्ट्रवादी, काँग्रेस मधील अनेक नवीन नेते देवेंद्र फडणवीस यांना जॉईन झाले.

एकंदरीत ज्याप्रमाणे सुधीर सूर्यवंशी यांनी जे विश्लेषण केले आहे त्यानुसार हेच लक्षात येते की, देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांच्या खूप पुढे निघून गेले आहेत. आता पंकजा मुंडे यांच्या मनात जी खदखद आहे ती चालूच राहील. आता त्यांच्यापुढे दोनच मार्ग आहेत. त्यांना एक तर एकनाथ खडसे यांच्या प्रमाणे वेगळा मार्ग निवडावा लागेल किंवा पक्षात राहून जे काही चालू आहे ते काही दिवस सहन करावे लागेल आणि संधीची वाट बघावी लागेल.

Tags:    

Similar News