मागील तीन वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अगदी महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आता शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांचा अचानकपणे या सरकारमध्ये प्रवेश असो असे राजकीय भूकंप आपण सगळ्यांनी पाहिले. एखाद्या चित्रपटाचा सुद्धा जितका सस्पेन्स नसेल असा सस्पेन्स आणि थ्रील राज्याच्या राजकारणात घडला. जे संपूर्ण महाराष्ट्रानेच काय जगाने पहिले. एक वर्षांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत उभी फूट पाडली आणि आपल्या सोबत चाळीसहून अधिक आमदार घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर वाद सुरू झाला खरी शिवसेना कोणाची ? सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांच्यासमोर हा वाद बरेच दिवस चालला आणि निवडणूक आयोगानं अखेर शिवसेनेचे धनुष्यबाण शिंदे यांच्या हाती सुपूर्द केलं. त्यानंतर अजूनही एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबितच आहे.
एकीकडे हे सगळं होत असताना मागील चार दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप झाला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच फूट पडली. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीतल्या आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सोबत आलेल्या आठ सहकाऱ्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. हा संपूर्ण राजकीय गदारोळ पाहता या परिस्थितीत निवडणुका लागल्या तर जनतेचा कौल कुणाला असेल हे पाहण्यासाठी आम्ही आमच्या ट्विटर आणि युट्युबवर लोकांना एक प्रश्न विचारला. प्रश्न अर्थातच महाराष्ट्रात आता निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येईल ? असा होता यामध्ये आम्ही लोकांना ३ पर्याय दिले होते. भाजप, शिवसेना, अजित पवार यांच्या युतीच की महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि तिसरा पर्यंत होता सांगता येत नाही.
आता या प्रश्नावर अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत आणि यामधून जे काही समोर आलं आहे ते सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे. लोकांना शिवसेनेत पडलेली फूट असेल किंवा राष्ट्रवादीत पडलेली फूट असेल हे पचनी पडलं आहे का ? एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड त्यांच्या फायद्याचं की तोट्याचं ? त्यानंतर आता अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय लोकांना रुचला आहे की नाही ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या प्रश्नावर लोकांनी दिलेल्या मतांच्या आधारे शोधता येतील..
आम्ही हा प्रश्न ट्विटर आणि युट्युब या दोन समाजमाध्यमांवर शेअर केला होता. youtube वर या प्रश्नावर 2 हजार 600 लोकांनी आपलं मत व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात आता निवडणूक झाली तर महाविकास आघाडीचे सरकार येईल असं 77% लोकांना वाटतं आहे. तर भाजप, शिवसेना आणि अजित पवार ही जी काही सध्या नवीन युती झाली आहे याविषयी 16 टक्के लोकांना वाटतं की आता निवडणुका झाल्या तर महायुतीची सत्ता येईल, असं वाटतं. तर सात टक्के लोकांनी यावर काहीच सांगता येत नाही, हा पर्याय निवडला.
ट्विटरवर पाहिलं तर 86 टक्के लोकांनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची सत्ता येईल असं पाच टक्के लोकांनी म्हटलं आहे, तर सांगता येत नाही असं 9% लोकांनी म्हटल आहे. ट्विटर वर 139 लोकांनी या प्रश्नावर त्यांचं मत नोंदवल आहे..
लोकांची मत जाणून घेण्यासाठी आम्ही हा प्रश्न युट्युब आणि ट्विटरवर शेअर केला होता. खरंतर हे अत्यंत छोट्या प्रमाणावर असलं तरी लोकं कशाप्रकारे या सगळ्या परिस्थितीकडे पाहतात त्याचा एक साधारण अंदाज बांधता येऊ शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..