टक्केवारी आणि कमिशनसाठी नव्हे तर समाजकारणासाठी मी राजकारणात आले, प्रणिती शिंदेंचा जनतेशी संवाद
मला सत्तेची भुक नाही, वडील मुख्यमंत्री असताना मी ती जवळून अनुभवली आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे म्हणत प्रणिती शिंदेंनी जनतेशी संवाद साधला आहे.
"माझे वडील हे देशाचे गृहमंत्री,ऊर्जामंत्री राज्याचे मुख्यमंत्री,आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते, लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरते आणि सत्ता काय असते हे मी बघितलंय, त्यामुळे सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाहीये," असं विधान काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे. त्या सोलापुरात यंत्रमागधारक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण त्यांच्या पदरी अद्याप मंत्रिपद पडलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चांना उधाण आले आहे.
एवढेच नाही तर सध्या विविध मंत्री आणि नेत्यांवर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी आणखी एक वक्तव्य यावेळी केले. " सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पावत्यांचं राजकारण चालू होतं, आणि हे बदलण्यासाठी मी राजकारणात आले. मला टक्केवारी, कमिशनचं राजकारण अजूनही जमत नाही." असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "राजकारणात येण्याअगोदर माझं काम हे सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत. मात्र,मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ निवडला आणि हे माझ्या वडिलांना सुद्धा माहिती नव्हतं. मी राजकारणात येण्यास आणि निवडणूक लढवण्यास त्यांनी विरोध केला. पण मला माझ्या समाजकारणातील क्षेत्र वाढवायचं होत." असेही प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.