संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. ही योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले होते. सध्या चर्चा सुरु आहे ती डिसेंबर महिन्यांच्या पैशांची. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त आनंदाची बातमी दिली आहे. या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी खुलासा केला आहे. तर लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचे आपले स्वप्न असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अडकू नयेत, म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच देऊन टाकले. 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, 23 नोव्हेंबरला निकाल आहे. यानंतर याच नोव्हेंबर मध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार आहोत, कारण आमचा हेतू स्पष्ट आहे. आम्ही देणारे लोक आहोत, घेणारे नाही. लाडक्या बहिणी यांना माफ करणार नाहीत. या अडथळे निर्माण करणाऱ्यांना त्या नक्कीच जोडे दाखवतील आणि या सर्वत्र भावांपासून त्या निश्चितपणे सजग आहेत. एवढेच नाही तर आम्ही केवळ १५०० रुपयांवर थांबणार नाही, आशीर्वाद मिळाला तर आम्ही ते आणखी वाढवू. माझ्या बहिणींना लखपती बनवण्याचे आमचे स्वप्न आहे", असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले.