नवीन सरकारने बालकांचा निधी पळवून लावला आणि पूर्वी मंजूर असलेली 2500 रुपये ही रक्कम देखील निधी स्वरूपात देण्याबाबतीतच्या निर्णयावर या निर्दयी सरकारने रोख आणली असा आरोप करीत आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले असल्याचे काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. संगमनेर येथील मथुरागिणी महोत्सव 2022 च्या निमित्ताने महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या कि, आमचं सरकार आलं त्यावेळी बालसंगोपन, अनाथ बालक, एकल महिला यांच्यासाठी सहायता निधी हा केवळ 400 रुपये इतका शुल्लक होता, आम्ही हा निधी वाढवून 1125 रुपये केला. मी मात्र समाधानी नव्हते, अजितदादा पवार यांच्यामागे मी तगादा लावला आणि त्यांनीदेखील विलंब न करता माझ्या मागणीचा स्वीकार करत हीच रक्कम आपण 2500 रुपये इतकी करू असं ठरलं. राज्याच्या अर्थसंकल्पमध्ये या विषयीची घोषणा देखील करण्यात आली आणि मी ठरवलं कि जर आपलं सरकार पूर्ण 5 वर्षे राहील तर या निधी मध्ये पुन्हा 100% वाढदिवसाच्या करून हा निधी 5000 रुपये इतका करू. परंतु मधेच खोक्यांचा गोंधळ घालत बोक्यांनी अनाथ बालकांचा निधी पळवून लावला आणि पूर्वी मंजूर असलेली 2500 रुपये ही रक्कम देखील निधी स्वरूपात देण्याबाबतीत च्या निर्णयावर या निर्दयी सरकारने रोख आणली असं त्या म्हणाल्या. याबाबतीत मी उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून किमान अनाथ मुलांचा तरी आपल्या सरकारने रोखू नये अशी विनंती केली आहे, विनंती मान्य न झाल्यास युद्ध देखील करण्याची धमक आपल्यात आहे असे म्हणत महाराष्ट्रातील जनतेची देखील साथ आपल्याला मिळेल असा विश्वास ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
संस्कृती बदलतेय आणि उपद्रव वाढतोय
सध्याच्या राजकारणात अपेक्षा बदलत आहेत, अपेक्षा वाढत आहेत आणि त्यात गैर काही नाही परंतु संस्कृती बदलतेय आणि उपद्रव वाढतोय ही मात्र चिंतेची बाब आहे. तसेच समाजमध्ये एकोपा जपून ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
सत्तापालट झाल्यापासून येथे देखील उपद्रव वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे, परंतु घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, इतकं खंबीर आणि स्थिर नेतृत्व आपल्या बरोबर आहे, आपण केवळ पुढे मार्गक्रमण करत करायचं असा धीर ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी उपस्थित जनतेस दिला.
15 लाख रुपयांची गोष्ट आपण 8 वर्षांआधी ऐकली परंतु आपल्या हाती मात्र काही लागलं नाही. सरकार पाडलं त्याच्या 1 महिन्याआधी मी प्रत्येक आंगणवाडी सेविकेस 15 हजार रुपये आणि मदतनीस यांस 12 हजार रुपये रोख मिळाले पाहिजेत असा प्रस्ताव आम्ही ठेवला होता, निर्णय आता या सरकारच्या हाती आहे आणि आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेणारच असा विश्वास यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
माणसं जपणारं संगमनेर प्रेरणादायी
यादरम्यान माणसं आणि संसार जपण्याची संगमनेरमधील कला माझ्यासाठी प्रेरणादायी असून ही कला मी येथून घेऊन जात असल्याचे मत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. संगमनेर येथील मथुरागिणी महोत्सव 2022 च्या निमित्ताने महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. युवा कीर्तनकार ह.भ.प. मुक्ता आणि उन्नती चाळक या दोघींचा सत्कार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यशोमती ठाकूर यांचे कौतुक करताना त्यांच्या संघर्षमयी प्रवासाचे कौतुक केले.