मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावरील भाषणा दरम्यान अजित पवार यांनी जोरदार बॅटिंग करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची धुलाई केली. देवेंद्र फडणवीस 288 आमदारांपैकी सगळ्यात नशिबवान आमदार आहे, अडीच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुध्दा झाले, असा टोलाच अजितदादांनी लगावला.
पण यावेळी अजित पवार यांनी बंडखोर आमदारांवर टीका देखील केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे कळताच बंडखोर आमदारांनी केलेल्या नाचावर अजित पवार यांनी जोरदार टीका केली. टेबलवर चढून नाच केला हे बरं नाही, असेही त्यांनी सुनावले.
त्याचबरोबर आमदार शहाजी बापू पाटील यांचे काय ती झाडी डॉयलॉग मारत अजित दादांनी शहाजी पाटील यांना सल्लादेखील दिला. मोठी माणसं कधी बदलतील सांगता येत नाही, शहाजीबापू तुम्ही सावध राहा, असा टोलाही अजितदादांनी लगावला.
पण त्याचवेळी १०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही आणि ४० आमदार असणारा मुख्यमंत्री होतो यात काहीतरी काळंबेरं आहे, हे माझं वाक्य लक्षात ठेवा, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच याआधी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेच्या नेत्यांसोबत शिवसैनिक जात नाहीत, असेही सांगितले. भाजपची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेच्या आधारावर त्यांनी आपला पक्ष वाढवत नेला.
तसेच अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही, या आरोपाला अजित पवार यांनी उत्तर देत आकडेवारीच सादर केली. " राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला असा आरोप केला गेला. मी काम करत असताना कधी भेदभाव करत नाही. आमदारांचा निधी २ कोटी वरून ५ कोटी केला, असे त्यांनी सांगितले.
एवढेच नाही तर एकनाथ शिंदे नगरविकास खात्याला १२ हजार कोटी निधी दिला गेला, आणखी १ हजार कोटी देण्याचं आश्वासन दिलं होतं,असंही अजित पवार यांनी सांगितले.