एकनाथ शिंदे गटाचा धनुष्यबाण चिन्हावर दावा?

Update: 2022-06-23 06:51 GMT

शिवसेनेची ओळख असलेलं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण. याच चिन्हावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे दावा करणार असल्याचे म्हंटले जात आहे. यासंदर्भात ते निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे वृत्त अनेक टेलिव्हिजन माध्यमातून समोर येत आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार शिंदे गटासोबत आहेत आणि हीच खरी शिवसेना आहे असा दावा करत ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या 34 आमदारांनी राज्यपालांना पत्र दिलेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असल्याचं म्हटले आहे, तसेच प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नेमणूक त्यांनी केलेली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून काढलेले आदेश बेकायदा आहेत अशीही भूमिका या आमदारांनी मांडलेली आहे. त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडून गेलेल्या आमदारांना आवाहन करत आपण राजीनामा द्यायला तयार आहोत आणि शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या उशिरा त्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा सोडत मातोश्रीवर गेले.

या सगळ्या घडामोडी झाल्या नंतर एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच दावा करणार असल्याचं समजत आहे. शिवसेनेतील दोन-तृतीयांश पेक्षा जास्त आमदार आमच्या गटात असून खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा करत ते निवडणूक आयोगाला धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी पत्र लिहिणार असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.

Tags:    

Similar News