ममता बॅनर्जीच्या पुतण्याला ईडीची नोटीस; 3 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले
मनी लाँडरिंग आणि कोळसा घोटाळा प्रकरणात टीएमसी खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना ईडी कडुन समन्स...
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टीएमसी खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा यांना समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने अभिषेक यांना 3 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचवेळी रुजीराला 1 सप्टेंबरला बोलावण्यात आले आहे. मनी लाँडरिंग आणि कोळसा घोटाळा प्रकरणात या दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. तर ईडीने दोघांकडून बँक तपशीलही मागितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा घोटाळ्यात आरोप असलेल्या कंपन्यांकडून आपल्या कंपनीमध्ये निधी हस्तांतरित केल्याचा या दोघांवर आरोप आहे. याच्या बदल्यात कंपन्यांसोबत काही बोगस करारही करण्यात आल्याचा आरोप आहे. ज्या कंपन्यांवर हे आरोप करण्यात आले आहेत, त्यामध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे वडील आणि ममता बॅनर्जी यांचे बंधूही अशाच एका कंपनीचे संचालक आहेत. तर ईडीसोबतच सीबीआय कोळसा घोटाळ्याचीही चौकशी करत आहे.