धनंजय मुंडेंच्या निर्णयाने 'त्या' विद्यार्थिनीचे गगन भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण

Update: 2021-07-29 12:26 GMT

सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी गुणवत्ता प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या तेजस्विनी शिंदे या ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात 'अंतरिक्ष यान प्रपलशन' या विषयात पीएचडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष आधार दिला असून, ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने मंजूर केलेली स्टायपेंडची रक्कम तिला मिळणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीच्या रकमेतून नियमाप्रमाणे न कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेजस्विनी शिंदे हिची सिडनी विद्यापीठात अंतरिक्ष यान विषयात पीएचडी साठी 6 देशातील 150 विद्यार्थ्यांमधून निवड झाली असून, ती एकमेव भारतीय विद्यार्थिनी आहे. यासाठी धनंजय मुंडे ते अगदी इस्रोच्या प्रमुखांनी देखील तिला खास दूरध्वनी करून तिचे अभिनंदन केले होते. सामान्य कुटुंबातील तेजस्विनीने बँकेतून कर्ज घेऊन आपली पदवी लंडन येथून पूर्ण केली होती. त्यावेळी तिने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा आज तिच्यावर डोंगर झाला होता.

तिची आर्थिक स्थिती पाहून सिडनी विद्यापीठाने तेजस्विनी हिला देय असलेला स्टायपेंड तिच्या शैक्षणिक कर्ज फेडीसाठी व उर्वरित रक्कम तिला शैक्षणिक खर्चासाठी मंजूर केला होता. मात्र स्टायपेंड ची रक्कम तिला अद्याप मिळालेली नसल्यामुळे तसेच तेजस्विनी ही गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिला परीक्षेस बसण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. याचाच विचार करून धनंजय मुंडे यांनी स्टायपेंडची रक्कम शिष्यवृत्तीच्या रकमेतून वजा न करण्याचा निर्णय विशेष बाब म्हणून घेतला आहे.

तर, "मी धनंजय मुंडे साहेबांकडे याबाबत मदत मागितली असता, त्यांनी तातडीने विशेष बाब म्हणून मला परदेश शिष्यवृत्तीचा पूर्ण लाभ, कसलीही कपात न करता देण्याचा निर्णय घेऊन माझे गगन भरारी घेण्याचे स्वप्न शक्य केले आहे. मुंडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांची मी शतशः ऋणी आहे;" अशा शब्दात तेजस्विनी शिंदे हीने आपल्या भावना व्यक्त करत मुंडेंचे आभार मानले आहेत.

Tags:    

Similar News