फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ - सचिन सावंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील भाजपशासित राज्यातील घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनेसंदर्भात चर्चेसाठी संसदेत विशेष अधिवेशनाची केलेली मागणी अगदी योग्य आहे. संघ विचारधारेतून महिला विरोधी बनलेल्या भाजपने देखील यासाठी पाठींबा द्यावा असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हंटले आहे.
महिला अत्याचारामध्ये उत्तर प्रदेश हे भाजपशासित राज्य सर्वात आघाडीवर आहे हे NCRB 2020 मधील आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. पण याच आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप शासित राज्यातील महिला आर्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. तेथील महिलांची देखील उद्धव ठाकरे यांना काळजी असून महिला विरोधी भाजपनेही या मागणीला पाठिंबा द्यावा. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा पाढाच त्यांनी वाचला. फडणवीसांच्या काळात गँगरेप व मर्डर च्या ४७ घटना घडल्याने २०१९ ला महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक होता. फडणवीसांच्या तथाकथित रामराज्यात २०१५ साली ३१ हजार २१६ घटना घडल्या, २०१६ साली ३१ हजार ३८८ घटना घडल्या तर २०१७ साली ३१ हजार ९७८ घटना, २०१८ साली ३५ हजार ४९७ घटना तर २०१९ साली ३७ हजार १४४ महिलांवर अत्याचार झाले. फडणवीस सरकार हे महिलांसाठी कर्दनकाळ ठरले असल्याचे देखील ते म्हणाले.
सावंत पुढे बोलताना म्हणाले की, महिला अत्याचारांमध्ये भाजपशासित उत्तर प्रदेश हे सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे. गॅंग रेप, मर्डर अशा प्रकारांमध्ये उत्तर प्रदेश हे सर्वात आघाडीवर आहे. हे सर्व जर बघितले तर उद्धव ठाकरे यांनी देशातील भाजपशासित राज्यातील घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनेसंदर्भात चर्चेसाठी संसदेत विशेष अधिवेशनाची केलेली मागणी अगदी योग्य आहे. संघ विचारधारेतून महिला विरोधी बनलेल्या भाजपने यासाठी पाठींबा द्यावा असं देखील सचिन सावंत म्हणाले.