बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं, मुख्यमंत्री संतापले

Update: 2024-11-02 11:53 GMT

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबादेवी येथून शायना एनसी यांना उमेदवारी दिलेली आहे. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी बाहेरचा उमेदवार दिल्याची टीका करताना इम्पोर्टेड माल चालणार नाही अशा आशयाचे विधान केले होते. यावरुन अरविंद सावंत यांना भाजपाने घेरले आहे. या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अरविंद सावंत यांची बाजू घेतली आहे. संजय राऊत यांनी यात महिलांचा काहीही अपमान झालेला नसल्याचा दावा केला आहे. अरविंद सावंत आमचे मोठे नेते आहेत. शायना एनसी मुंबादेवी येथून निवडणूक लढवित आहेत आणि त्या मुंबादेवी येथील रहिवासी नाही. स्थानिक भूमिपूत्र नाहीत. तर याचा एवढा इश्यू का केला जात आहे? असा उलट आरोप राऊत यांनी केलेला आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देत म्हणाले की, " हे दुर्दैवी आहे. या महाराष्ट्रात महिला भगिनींचा अपमान करणं हे ज्यांनी केलंय त्यांना लाडक्या बहिणी घरी बसवतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवतील. बाळासाहेब असते तर कोणत्या शिवसैनिकांने असं केलं असतं तर त्याचं थोबाड फोडलं असतं. या सगळ्या लाडक्या बहिणी मिळून लाडक्या बहिणीचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेतील, निवडणुकीत त्यांना कायमचे घरी बसतील", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

तर या प्रकरणावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हणाल्या की, "मराठीत माल हा शब्द अनेक वेळा महिलांचा अपमान करण्यासाछी वापरला जातो. निवडणूक आयोगाकडे याबाबत लेखी तक्रार करणार आहे. त्याचे दखल घेऊन अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात एफआयआर दाखल

या प्रकरणात नागपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल निवडणूक आयोग आणि महिला आयोगाने घेतली आहे. हा महिलांच्या सन्मानाचा लढा आहे असे या प्रकरणात भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी म्हटले आहे. जर कोणतीही व्यक्ती महिला असो की पुरुष केलेल्या कामाच्या आधारे बोलत असेल तुम्ही डिबेट करायला तयार होत नाही, पण वैयक्तिक टीका करता. ही छोटी गोष्ट नाही. असेही शायना यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News