ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठीच संजय राऊतांची केंद्रावर टीका: चित्रा वाघ

Update: 2021-07-27 15:50 GMT

केंद्र आमचा बाप आहे, त्यांच्याकडून मदत झाली तर ती नक्कीच स्विकारली जाईल, असं सांगतानाच केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मंत्री आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचा दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं, अशी टीका सामनातून केंद्रातील भाजप सरकारवर करण्यात आली होती. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "सर्वज्ञानी संजयजी राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत. प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खुप जणांचे प्राण वाचू शकले असते. दरेकरजी व वृत्तवाहिन्या आधी पोहचल्या, तेथील नागरिकांनीच ३९ मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर १६ तासाने प्रशासन अवतरले",असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात. व सरकार पंगु होते. ठाकरे सरकारच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा दुर्घटनांमधे सरकारच्या निष्क्रीयेतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. संजयजी यानंतरसुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच 'मढ्यावरचे लोणी खाणे',... नारायण राणे केंद्रातर्फे नुकसानीचा आढावा व मदतकार्यासाठी दौरा करत असताना अशावेळी अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर होते?, पुरग्रस्त कोकणच्या जनतेला हे अपेक्षितच होते अशावेळेस तरी आपण आपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, परंतु आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले, असेही चित्रा वाघ म्हणाल्यात.

राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले असून, अनेक लोकं बेघर झाली आहेत. तर अनेक गावात अजूनही प्रशासनाची योग्य मदत पोहचत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असं असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये याच मुद्यावरून एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

Tags:    

Similar News