सुप्रिया सुळेप्रकरणी महिला आयोगाकडे चंद्रकांत दादांनी केली दिलगिरी व्यक्त

Update: 2022-05-29 11:04 GMT

 खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत दादा पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून महिला आयोगाने त्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले होते. चंद्रकांत दादांनी आता महिला आयोगाकडे तसा खुलासा केला आहे. खुलासा करताना त्यांनी अनादर नसताना विनाकारण अपमान झाला असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वी OBC आरक्षणासाठी केलेल्या उपोषणामध्ये माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. आरक्षण देता येत नसेल तर घरी बसा, जेवण करा, दिल्लीत जा नाही तर मसणात जा पण आम्हाला आरक्षण द्या अशा पद्धतीचं विधान त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना केलं होतं. त्यांच्या या विधानावर राज्यभरातील महिला पेटून उठल्या होत्या. महाविकास आघाडीतील प्रत्येक महिला नेत्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर थेट राज्य महिला आयोगानेच चंद्रकांत पाटील यांना सदर प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले होते.

महिला आयोगाच्या या आदेशानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना एक पत्र लिहुन खुलासा केला आहे. आपल्या पत्रात ते म्हणाले आहेत, "प्रती,

मा. रुपालीताई चाकणकर,

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य महिला आयोग.

सस्नेह नमस्कार,

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.

माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

C.B. Patil

आ. चंद्रकांत (दादा) पाटील

(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )"

दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनीही ट्विट करत पाठींबा दिल्याप्रकरणी राज्यातील सर्व महिलांचे आभार मानले होते. चंद्रकांत दादांच्या या दिलगिरीनंतर तरी हे प्रकरण शांत होणार का की आणखीन पुढे वाढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News